खात्यातून पैसे कापले तरी समोरच्याला मिळण्यासाठी लागणार ६० मिनिटे; फसवणूक झाल्यास ‘सिंगल क्लिक’वर व्यवहार रद्द करण्याची सुविधा
देशभरात वाढत चाललेल्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला लगाम घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आता एक क्रांतिकारी बदल करण्याच्या तयारीत आहे. नॅशनल सायबर क्राईमच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये तब्बल २८ लाख डिजिटल फसवणुकीच्या घटना घडल्या असून, सर्वसामान्यांचे हजारो कोटी रुपये लुटले गेले आहेत. ही आकडेवारी पाहता, आरबीआयने आता ‘सेफ्टी फर्स्ट’ धोरण राबवण्याचे ठरवले आहे. यानुसार, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली, तर ती रक्कम खात्यातून त्वरित वळती होईल, मात्र समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा होण्यासाठी किमान एक तासाचा अवधी लागेल. हा एक तासाचा ‘बफर पिरियड’ ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी दिला जाणार आहे.
या नवीन प्रस्तावाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘सिंगल क्लिक प्रोटेक्शन’. जर एखाद्या युझरला पैसे पाठवल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर तो एका क्लिकवर ते पेमेंट त्वरित रोखू शकणार आहे. यामध्ये युपीआय (UPI), नेट बँकिंग आणि कार्ड पेमेंट या तिन्ही सुविधा सुरक्षित केल्या जातील. सध्या सायबर भामटे पैसे चोरल्यानंतर अवघ्या काही सेकंदात ते दुसऱ्या खात्यात वळवतात, ज्यामुळे पोलिसांना तांत्रिक अडथळे येतात. मात्र, आरबीआयच्या या नवीन नियमामुळे पैशांचे हस्तांतरण संथ होईल आणि संशयास्पद व्यवहारांची पडताळणी करण्यास बँकेला पुरेसा वेळ मिळेल.
या मोहिमेअंतर्गत आरबीआयने सायबर गुन्हेगारांच्या खात्यांवरही करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. ज्या खात्यांमध्ये अचानक मोठी रक्कम जमा होते, अशा खात्यांची तातडीने चौकशी केली जाईल. जर खातेदाराचे ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण किंवा बनावट आढळले, तर ते खाते त्वरित गोठवण्यात येईल. जरी या नियमामुळे पेमेंटसाठी थोडा उशीर होणार असला, तरी सामान्य नागरिकांचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. डिजिटल इंडियाला अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने केंद्रीय बँकेने उचललेले हे एक धाडसी पाऊल मानले जात आहे.




