दिल्लीच्या तोंडचा घास गुजरातने हिरावला; एका धावेच्या विजयाने शुभमन गिलच्या पलटणीने उघडले विजयाचे खाते, तर मुंबईची तळाला घसरण.
आयपीएल २०२६ च्या १४ व्या सामन्यात बुधवारी क्रिकेट चाहत्यांना श्वास रोखून धरायला लावणारा थरार पाहायला मिळाला. ८ एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या १ धावेने पराभव करत सनसनाटी विजय मिळवला. २११ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना के.एल. राहुलची ९२ धावांची खेळी आणि डेव्हिड मिलरचे प्रयत्न दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाला आणि दिल्लीची विजयाची हॅट्रिक हुकली. या विजयासह गुजरातने हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला असून गुणतालिकेत थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
या निकालामुळे आयपीएल २०२६ च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठी फेरबदल झाले आहेत. गुजरात टायटन्स आता ३ सामन्यांत १ विजय आणि २ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचली आहे, ज्यामुळे मुंबई इंडियन्सची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे, पराभवानंतरही दिल्ली कॅपिटल्स चौथ्या स्थानी कायम आहे, मात्र त्यांचा नेट रनरेट कमी झाला आहे. सध्या राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी असून पंजाब किंग्स दुसऱ्या आणि आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, बलाढ्य मानले जाणारे कोलकाता नाईट रायडर्स (९ वे स्थान) आणि चेन्नई सुपर किंग्स (१० वे स्थान) अद्याप पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. आज, ९ एप्रिल रोजी केकेआर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ईडन गार्डन्सवर लढत होणार असून, केकेआर आपले खाते उघडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




