IPL 2026 : CSK चा सलग तिसरा पराभव, आरसीबीविरुद्धच्या शरणागतीनंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडचा संयम सुटला म्हणाला…

spot_img

“पराभवाचे खापर माझ्यावरच फोडा”; कर्णधार गायकवाडने स्वत:च्याच खेळीची केली चिरफाड, आरसीबीच्या फलंदाजांनी सीएसकेच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले.

आयपीएल २०२६ मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) ची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे. स्पर्धेचा पहिला आठवडा उलटला तरी चेन्नईला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला असून, या पराभवाच्या हॅटट्रिकमुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड कमालीचा संतापलेला पाहायला मिळाला. या पराभवानंतर ऋतुराजने कोणत्याही सहकलाकारावर बोट न ठेवता थेट स्वतःलाच जबाबदार धरले आहे. “जर मी सुरुवातीला धावा केल्या असत्या, तर निकालाचे चित्र वेगळे असते,” अशा शब्दांत त्याने आपल्या अपयशाची कबुली दिली.

या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. टिम डेव्हिडच्या वादळी ७० धावा (२५ चेंडू, ८ षटकार) आणि देवदत्त पडिक्कलच्या ५० धावांच्या जोरावर आरसीबीने २५० धावांचा डोंगर उभा केला होता. या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना चेन्नईची आघाडीची फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मधल्या फळीत सरफराज खान (५०), प्रशांत वीर (४३) आणि जेमी ओव्हरटन (३७) यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र वाढत्या धावगतीचा दबाव त्यांना सोसवला नाही. संपूर्ण संघ २०७ धावांत गारद झाला आणि ४३ धावांनी चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.

सामन्यानंतर बोलताना ऋतुराज म्हणाला की, “१४ व्या षटकापर्यंत आम्ही सामन्यात होतो, पण त्यानंतर झालेल्या चुका महागात पडल्या. विराट कोहलीने सोडलेला झेल आणि टिम डेव्हिडची आक्रमक फटकेबाजी गेमचेंजर ठरली.” आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमारने तीन बळी घेत चेन्नईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. चेन्नईच्या या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून, आता पुढील सामन्यांत संघ कशी पुनरागमन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋतुराजने पराभवाचे खापर स्वतःवर घेतले असले तरी, संपूर्ण संघाला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ