Alert Warning of Rain : विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’; काढणीला आलेला घास अवकाळीने हिरावला

spot_img

कांदा, गहू आणि फळबागांना निसर्गाचा मोठा फटका; शेतात साचलेल्या पाण्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी

राज्यातील हवामानाचा लहरीपणा थांबण्याचे नाव घेत नसून, गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे सावट आजही कायम आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आज ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, ढगाळ हवामानासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. एका बाजूला पावसाचे संकट असताना दुसऱ्या बाजूला राज्याच्या काही भागांत उष्णतेचा पारा देखील चढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील या सततच्या चढउतारामुळे नागरिकांच्या आरोग्यासोबतच शेतीचे गणितही पूर्णपणे कोलमडले आहे.

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात काढणीला आलेला कांदा पावसामुळे भिजून खराब झाला असून गहू आणि संत्र्याच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. नाशिकच्या चांदवड परिसरातही अशीच विदारक स्थिती पाहायला मिळत आहे. कष्टाने पिकवलेला आणि वाळवण्यासाठी शेतात काढून ठेवलेला उन्हाळ कांदा गारपिटीमुळे चिखलात गेल्याने बाजार समितीत नेण्यापूर्वीच तो सडून जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

फळबागांच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले आहे. वादळी वाऱ्यामुळे पपईच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. आव्हाने परिसरात एकाच शेतकऱ्याच्या ३ एकरातील हजारो झाडे जमीनदोस्त झाली असून, तोडणीला आलेली फळे जमिनीवर पडून मातीमोल झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत करावी, अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ