Ashok Kharat : खरात प्रकरणात आता जमीन एजंट आणि महसूल अधिकारीही SIT च्या जाळ्यात!

spot_img

लाखोंची जमीन कवडीमोल भावात लाटली; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तपासाचे चक्र फिरले

अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक पदर आता उलगडू लागले आहेत. केवळ लैंगिक अत्याचारच नव्हे, तर जमिनी हडपण्याचे त्याचे मोठे रॅकेट असल्याचे आता स्पष्ट होत आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने अनेकांना भीती घालून किंवा फसवणूक करून त्यांच्या मौल्यवान जमिनी अत्यंत स्वस्त दरात स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, या गुन्हेगारी कारस्थानात त्याला मदत करणारे जमीन खरेदी-विक्रीचे एजंट आणि नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महसूल अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

तपासादरम्यान असे दिसून आले की, सुमारे ६० लाख रुपये किमतीची जमीन केवळ २२ लाखांत बळकावण्यासाठी काही एजंट्सनी मध्यस्थी केली होती. खरातचे आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर या व्यवहारांमध्ये सरकारी यंत्रणेतील काही लोकांचाही हात असण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे एसआयटी आता या दलालांची आणि संशयास्पद अधिकाऱ्यांची कसून चौकशी करणार आहे. खरातने फसवणुकीसाठी वापरलेल्या क्लृप्त्या पाहून स्वतः तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, खरातला मदत करणाऱ्या एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर आता तपासाला मोठी गती आली असून, ज्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळतील त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाणार आहे. भोंदू बाबाच्या या साम्राज्याला साथ देणाऱ्या ‘पांढरपेशा’ गुन्हेगारांचे धाबे आता दणाणले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ