आयपीएल २०२६ च्या हंगामात मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली विजयाचा ‘श्रीगणेशा’ करत आपला १४ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. २०१२ नंतर पहिल्यांदाच मुंबईने सलामीचा सामना जिंकत स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. आता शनिवारी, ४ एप्रिल रोजी मुंबई आपला दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांच्याच बालेकिल्ल्यात, म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्यात मुंबईचा ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला असून, संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष त्याच्या कामगिरीकडे लागले आहे.
जसप्रीत बुमराह सध्या आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत ड्वेन ब्राव्होसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. बुमराह आणि ब्राव्हो या दोघांच्या नावावर प्रत्येकी १८३ विकेट्स आहेत. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात बुमराहने केवळ १ विकेट मिळवल्यास तो ब्राव्होला मागे टाकून या यादीत दुसऱ्या स्थानी एकटा विराजमान होईल. आयपीएल इतिहासात वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान सध्या भुवनेश्वर कुमार (१९९ विकेट्स) याच्याकडे आहे. बुमराहने आतापर्यंत मुंबईसाठी १४६ सामन्यांत १८३ बळी टिपले असून, त्याची भेदक गोलंदाजी दिल्लीच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते.
एकीकडे बुमराह ब्राव्होला मागे टाकण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे भुवनेश्वर कुमारला आपल्या विकेट्सचे द्विशतक (२०० विकेट्स) पूर्ण करण्यासाठी केवळ १ बळीची गरज आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा ‘सर्वकालीन’ विक्रम फिरकीपटू युझवेंद्र चहल (२२३ विकेट्स) याच्या नावावर आहे. सध्या बुमराह ज्या लयीत आहे, ते पाहता तो आगामी सामन्यांमध्ये अनेक दिग्गजांना मागे टाकेल, अशी चाहत्यांना खात्री आहे. दिल्लीविरुद्धच्या या हाय-व्होल्टेज सामन्यात बुमराह आपली जादू चालवून मुंबईला सलग दुसरा विजय मिळवून देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.




