टी-20 कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना रहाणेने सुनावले खडे बोल; म्हणाला, “माझा खेळ न पाहताच लोक बोलतायत!”
भारतीय क्रिकेटचा ‘क्लासिक’ फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या आयपीएल 2026 मधील आपल्या फॉर्ममुळे टीकेच्या केंद्रस्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असलेल्या रहाणेकडून यंदाच्या सीझनमध्ये अद्याप मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही, ज्यामुळे सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात त्याच्या उपयुक्ततेवर चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व टीकांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी रहाणेने आता बॅटने नाही तर शब्दांनी मैदानात उतरून प्रत्युत्तर दिले आहे. रहाणेच्या मते, त्याच्याविरुद्ध एक विशिष्ट ‘अजेंडा’ राबवला जात असून, जे लोक त्याच्यावर टीका करत आहेत त्यांना कदाचित त्याचा विजय पाहणे सहन होत नाहीये.
रहाणेने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, 2023 च्या आयपीएल सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता आणि त्यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 170 च्या वर होता. तरीही केवळ काही डावांमधील खराब कामगिरीवरून त्याच्या संपूर्ण क्षमतेवर शंका घेणे चुकीचे आहे. “लोक माझा गेम नीट बघत नाहीत किंवा त्यांना मला यशस्वी बघायची इच्छा नाहीये,” अशा शब्दांत त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. टीकाकारांना क्रिकेटची तांत्रिक समज नाही किंवा ते आकसापोटी असे बोलत आहेत, असा दावाही त्याने केला.
सध्याच्या टीकेला ‘जळफळाट’ मानून रहाणेने हे देखील स्पष्ट केले की, प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात वाईट काळ येतो, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याचा खेळ संपला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाची धुरा वाहत असताना, केवळ एका खराब इनिंगमुळे संपूर्ण रणनीती बदलता येत नाही. त्याने आपल्या टीकाकारांना आरसा दाखवताना म्हटले की, जे लोक खेळाचा निष्पक्ष आढावा घेत नाहीत, त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या हेतूवर आणि मेहनतीवर त्याचा जास्त विश्वास आहे. आता आगामी सामन्यांमध्ये अजिंक्यची बॅट पुन्हा तळपणार का आणि तो या टीकाकारांना आपल्या खेळाने गप्प करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




