LPG Gas Shortage : महाराष्ट्रात एलपीजीचा प्रचंड तुटवडा; मुंबईत साखळदंडाने बांधले सिलिंडर, तर संभाजीनगरमध्ये कोट्यवधींची चोरी उघड

spot_img

इराण-इस्रायल युद्धाचा सर्वसामान्यांच्या चुलीला फटका; मालवणीत रस्ता रोको तर जळगावात महामार्ग जाम, टंचाईच्या आडून काळाबाजार जोरात

जागतिक स्तरावर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाचे चटके आता महाराष्ट्रातील गृहिणींच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. राज्यातील मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असून, संतप्त नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, मुंबईतील मालाड (मालवणी) सारख्या दाट वस्तीच्या भागात नागरिक आपले सिलिंडर चोरीला जाऊ नयेत म्हणून चक्क साखळदंडाने बांधून आणि कुलूप लावून रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक महिला रात्रभर रांगा लावून बसल्या असूनही त्यांना गॅस मिळत नसल्याने जनक्षोभ उसळला आहे.

जनता गॅससाठी वणवण फिरत असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस चोरीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. राज्यस्तरीय दक्षता पथकाने वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवारात धाड टाकून तब्बल १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका हॉटेलच्या मागे टँकरचे सील तोडून गॅस चोरला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. जप्त केलेल्या ३५,२२० किलो गॅसचा वापर केला असता, तर किमान २४८० कुटुंबांची महिनाभराची चूल पेटली असती. या कारवाईमुळे टंचाईच्या काळातही काही लोक साठेबाजी आणि काळाबाजार करून सर्वसामान्यांची लूट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपुरात गेल्या १८ दिवसांपासून ऑनलाइन बुकिंग यंत्रणा कोलमडली असून एजन्सीबाहेर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले आहेत. अमरावतीमध्येही होम डिलिव्हरी मिळत नसल्याने नागरिकांनी एजन्सीवरच धाव घेतली आहे. जळगावच्या जामनेरमध्ये तर संतप्त नागरिकांनी दीड तास महामार्ग रोखून धरला. पहाटेपासून रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना सकाळी अचानक ‘स्टॉक संपला’ असे सांगितल्याने नागरिकांचा संयम सुटला. अखेर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून सर्वांना गॅस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सध्याची परिस्थिती पाहता, युद्ध थांबले तरी पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही काळ जावा लागेल, असे चित्र दिसत आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना गॅससाठी असाच संघर्ष करावा लागणार असल्याचे चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ