सोलापूर जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे आंदोलनस्थळी पोहोचले असून परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले असून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. घोषणाबाजी करत आपली भूमिका मांडत असताना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, शौर्य प्रतिष्ठानने गंभीर आरोप करत म्हटले आहे की, श्री खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारावर मध्यरात्री कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हा पुतळा उभारण्यात आला. यामागे समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
संस्थेने स्पष्ट केले की त्यांचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नसून, तो उभारण्यात आलेल्या ठिकाणाला आहे. देवस्थानच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा असल्याने तो योग्य ठिकाणी हलवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासन सतर्क झाले असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.




