झुंबराची लाईट विझली की ‘एंट्री’ बंद; एका बड्या आमदाराची पत्नीही होती खरातच्या संपर्कात?
भोंदू बाबा अशोक खरात याच्या पापकर्मांचा पाढा आता ‘विशेष तपास पथका’च्या (SIT) चौकशीत वाचला जात असून, दररोज अंगावर काटा आणणारी माहिती समोर येत आहे. खरात आपल्या कार्यालयात महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी ‘शुद्धीकरण’ नावाचा कोडवर्ड वापरत असे. जेव्हा तो एखाद्या महिलेला केबिनमध्ये बोलवायचा, तेव्हा केबिनमधील खास झुंबराची लाईट बंद केली जात असे—ज्याचा अर्थ ‘आत कोणालाही प्रवेश नाही’ असा असायचा. याच अंधाराचा फायदा घेऊन तो महिलांवर अत्याचार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर, व्यवसायातील अडथळे दूर करण्याच्या नावाखाली ‘अवतार पूजा’ नावाचा दुसरा कोड वापरून तो भाविकांची मोठी आर्थिक फसवणूक करत असे.
तपासात खरातच्या लुटमारीचे आणखी एक विचित्र पैलू उघड झाले आहेत. तो भक्तांना ‘जादुई तुर्की मध’ नावाचा पदार्थ तब्बल ९ लाख रुपये प्रति किलो दराने विकत असे, जो तुर्कीतील एका गुप्त गुहेतून आणल्याचा बनाव तो रचत असे. सध्या खरातच्या विरोधात ८ गुन्हे दाखल झाले असून ५० हून अधिक पीडितांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. या प्रकरणातील सर्वात खळबळजनक वळण म्हणजे, खरातच्या ‘विशेष भक्त’ परिवारात एका बड्या आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. नाशिकमधील त्याच्या कॅनडा कॉर्नर कार्यालयात ही महिला सातत्याने जात असल्याचे समजते. आता या ‘राजकीय’ कनेक्शनमुळे अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले असून, खरातचे हे जाळे नेमके कुठेपर्यंत पसरले आहे, याचा तपास पोलीस वेगाने करत आहेत.




