**मोहम्मद बी. गालिबफ यांना ‘सुप्रीम लीडर’ बनवण्याची अमेरिकेची योजना?
अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये आता एका नवीन ‘सस्पेन्स’ची भर पडली असून, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन इराणमधील कट्टरपंथीय नेते मोहम्मद बी. गालिबफ यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकन मीडिया आउटलेट ‘एक्सियोस’च्या दाव्यानुसार, ट्रम्प प्रशासन गालिबफ यांना इराणचे पुढील सर्वोच्च नेते (सुप्रीम लीडर) म्हणून पाहण्यास इच्छुक आहे. विशेष म्हणजे, गालिबफ यांच्याशी चर्चा करण्यासाठी ट्रम्प चक्क उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांना पाठवण्यासही तयार आहेत. इराणच्या संसदेचे विद्यमान स्पीकर असलेले गालिबफ हे अयातुल्ला अली खामेनेई यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात, परंतु त्यांना आपल्या गोटात खेचून इराणमधील सत्तेचे समीकरण बदलण्याचा अमेरिकेचा हा धाडसी प्लॅन असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, या कथित चर्चेमुळे गालिबफ यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे संकेत स्वतः ट्रम्प यांनीच एका प्रश्नाला उत्तर देताना दिले आहेत. “मी जास्त काही सांगू शकत नाही, कारण त्याला मारले जाऊ शकते,” या ट्रम्प यांच्या विधानाने संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे. मात्र, गालिबफ यांनी स्वतः सोशल मीडियावर येत अमेरिकेसोबत अशा कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. २०१३ आणि २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीत पराभूत झालेले गालिबफ हे एकमेव असे नेते आहेत जे मुज्तबा खामेनेई यांच्या निर्णयांना आव्हान देऊ शकतात, असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचे मत आहे. त्यामुळेच इराणच्या सत्तेत ‘मोहरा’ बदलून ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’वर नियंत्रण मिळवण्याची ही अमेरिकेची नवीन स्ट्रॅटेजी तर नाही ना, अशी चर्चा आता जागतिक स्तरावर रंगू लागली आहे.




