Vitthal Rukmini Mandir Pandharpur : पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून गोंधळ; भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे मंदिराबाहेर धक्काबुक्की

spot_img

मे महिन्याच्या सुट्ट्या आणि पुरुषोत्तम अधिकमासाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी तासन्‌तास रांगा लागत असताना दुसरीकडे व्हीआयपी दर्शनावरून झालेल्या गोंधळामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णराज महाडिक हे काही सहकाऱ्यांसह विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिर प्रशासनाकडून त्यांना आणि त्यांच्या मोजक्या सहकाऱ्यांना व्हीआयपी प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. मात्र त्यांच्यासोबत आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनीही त्याच मार्गाने मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्हीआयपी गेटवर मोठी गर्दी झाली आणि धक्काबुक्की, ढकलाढकलीचा प्रकार घडला. काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, मंदिरात सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी पाच तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत राजकीय व्यक्तींना विशेष सवलती दिल्या जात असल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “एकीकडे सामान्य भक्त रांगेत उभे राहतात आणि दुसरीकडे राजकीय मंडळींना थेट प्रवेश मिळतो,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.

पुरुषोत्तम अधिकमासाच्या सुरुवातीलाच पंढरपुरात चार लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संपूर्ण शहर भाविकांनी गजबजून गेले आहे. चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

मंदिर प्रशासनाने दर्शन रांगांचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या असून पुढील एक महिना भाविकांची अशीच मोठी गर्दी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ