तामिळनाडूच्या राजकारणात आज एक सुवर्णक्षण लिहिला गेला आहे. चित्रपटसृष्टीतील महानायक विजय थलपती यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या काही दिवसांपूर्वी स्थापन केलेल्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत मिळवलेला हा ऐतिहासिक विजय संपूर्ण देशासाठी थक्क करणारा ठरला आहे. राज्यपाल यांनी विजय यांच्यासह ९ नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती, मात्र या राजकीय सोहळ्यापेक्षा जास्त चर्चा रंगली ती मंचावर उपस्थित असलेल्या अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिची.
विजय थलपती आणि त्यांच्या पत्नीच्या घटस्फोटाचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. यामुळेच की काय, या महत्त्वाच्या सोहळ्याकडे विजय यांच्या पत्नी आणि मुलांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. मात्र, विजय यांची कथित गर्लफ्रेंड मानली जाणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन या सोहळ्याला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. त्रिशाच्या उपस्थितीने आणि तिच्या खास लूकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ज्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी तिला तिच्या भावना विचारल्या, तेव्हा तिने चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवत, “धन्यवाद.. मी या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत आहे,” अशी छोटी पण अर्थपूर्ण प्रतिक्रिया दिली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोणीही विचार केला नव्हता अशी कामगिरी विजय यांच्या पक्षाने करून दाखवली आहे. प्रस्थापितांना धक्का देत जनतेने ‘थलपती’च्या नेतृत्वावर विश्वास टाकला. विशेष म्हणजे, मतमोजणीच्या दिवशीही त्रिशा कृष्णन विजय यांच्या घरी पोहोचली होती, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. जरी विजय यांचे कुटुंब या सोहळ्याला उपस्थित नसले, तरी त्यांच्या राजकीय प्रवासातील हा ऐतिहासिक विजय तमिळ जनतेसाठी उत्सवाचा ठरला आहे. आता तामिळनाडूमध्ये विजय यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार नक्की काय बदल घडवणार, याकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत.




