नाशिकमधील टीसीएस कंपनीत कथित लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 42 दिवस फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले. नाशिक पोलिस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवत ही कारवाई केली.
अटकेनंतर शुक्रवारी तिला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने निदा खानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, विशेष तपास पथकाकडून (SIT) तिची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया देत काही महत्त्वाचे दावे केले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, निदा खान एचआर विभागात कार्यरत नव्हती आणि एफआयआर दाखल होण्यापूर्वीच तिची बदली करण्यात आली होती.
ओवैसी यांनी पुढे म्हटले की, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवणे योग्य नाही. या प्रकरणात राजकीय हेतूने आरोप करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी निदा खानला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच काही माध्यमांकडून “मीडिया ट्रायल” सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
नाशिकमधील या कथित धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. आता निदा खानच्या अटकेनंतर तपासाला अधिक वेग मिळाला असून, एसआयटीकडून या प्रकरणातील सर्व पैलूंवर तपास सुरू आहे.




