Thane Gavdevi Bhaji Market Fire Accident : ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे तांडव; आग विझवताना अग्निशमन जवान आणि रक्षकाचा मृत्यू

spot_img

कापड दुकाने आणि गोडाऊन जळून खाक, लाखोंचे नुकसान; अरुंद गल्ल्यांमुळे बचावकार्यात आले मोठे अडथळे.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या गावदेवी भाजी मार्केटला आज (२१ मे) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आगीने वेढले. पहाटेच्या वेळी बाजारपेठ शांत असताना अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या मार्केट परिसरामध्ये कपड्यांची दुकाने आणि प्लास्टिकसह इतर ज्वलनशील साहित्याची गोडाऊन असल्यामुळे आगीची तीव्रता वेगाने वाढली आणि अनेक दुकाने भस्मसात झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या दुर्घटनेत कर्तव्य बजावताना धुरामुळे गुदमरून आणि होरपळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये ठाणे मनपाचे अग्निशमन जवान सागर शिंदे (४३ वर्ष) आणि रात्रपाळीवर तैनात असलेले सुरक्षारक्षक काळू गाडेकर (५३ वर्ष) यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे जवान ५ गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. भाजी मार्केटमधील अतिशय अरुंद गल्ल्या आणि परिसरात पसरलेले धुराचे प्रचंड साम्राज्य यामुळे सुरुवातीला आग विझवण्याच्या कामात जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, जीवाची बाजी लावून जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दोन्ही मृतांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने बाजारात नेहमीसारखी ग्राहकांची गर्दी नव्हती, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

या भीषण आगीत कापड व्यापाऱ्यांची दुकाने आणि साठवून ठेवलेले साहित्य जळाल्यामुळे बाजारपेठेचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. या अग्निकांडामुळे परिसरातील सकाळच्या वाहतुकीवर आणि नेहमीच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ