नवी मुंबईतील आशियातील प्रमुख कृषी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या एपीएमसी परिसरातील इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या २०२६-२७ च्या धोकादायक इमारतींच्या यादीत एपीएमसीतील अनेक महत्त्वाच्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः मसाला मार्केटमधील मध्यवर्ती ‘शिकागो प्रकार-२, बाजार-२’ इमारत अतिधोकादायक ‘सी-१’ वर्गात टाकण्यात आली असून ती तातडीने रिकामी करून पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालिकेच्या अहवालानुसार या इमारतीची अवस्था अत्यंत जर्जर झाली असून कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय एपीएमसी प्रशासनाचे कार्यालय, भाजीपाला मार्केटमधील काही इमारती तसेच फळ मार्केटमधील जी-३११ आणि जी-३१२ गाळ्यांचाही ‘सी-२ अ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या इमारतींना तातडीच्या संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या परिसरात इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे, त्याच ठिकाणी कार्यालये, हॉटेल आणि ज्यूस सेंटर सुरू असल्याने पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दरवर्षी नोटिसा आणि स्ट्रक्चरल ऑडिट केले जात असले तरी प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
विशेषतः कांदा-बटाटा मार्केटमधील काही इमारती गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत असल्याचे सांगितले जाते. पुनर्रचनेबाबत निर्णय लांबणीवर पडत असल्याने व्यापारी आणि बाजारातील घटकांमध्ये असंतोष वाढत आहे. दररोज हजारो नागरिकांची वर्दळ, मोठ्या प्रमाणावरील मालवाहतूक आणि वाढती अतिक्रमणे यामुळे एपीएमसीतील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे.
महानगरपालिकेने अतिधोकादायक इमारतींचा वापर तात्काळ बंद करण्याचा इशारा दिला असून नियमांचे पालन न झाल्यास भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांची जबाबदारी संबंधित मालक आणि व्यवस्थापनावर राहील, असे स्पष्ट केले आहे.




