आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी पोहोचले तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन; एकाच गाडीतून आल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण
तमिळ चित्रपटसृष्टीतील ‘थाला’ अर्थात प्रसिद्ध अभिनेता अजित कुमार यांच्या मातोश्री मोहिनी मणी यांचे शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने चेन्नईतील राहत्या घरी निधन झाले. आईच्या निधनाची दुःखद वार्ता मिळताच अजित कुमार हे तात्काळ दुबईहून चेन्नईला परतले. या कठीण प्रसंगी अजित कुमार आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. यामध्ये तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनीही शनिवारी रात्री अजित कुमार यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. सध्या सोशल मीडियावर या भेटीचा एक भावूक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री विजय हे त्यांचे मित्र अजित कुमार यांना घट्ट मिठी मारून धीर देताना दिसत आहेत.
“माझा जिवलग मित्र अजित कुमार यांच्या मातोश्री श्रीमती मोहिनी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला अत्यंत दुःख झाले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अजितच्या पाठीशी ढाल बनून उभ्या राहिलेल्या आईला गमावल्याचे दुःख मोठे आहे.”
मात्र, या अत्यंत भावूक आणि संवेदनशील प्रसंगी नेटकऱ्यांचे लक्ष एका वेगळ्याच गोष्टीने वेधून घेतले आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या सुरक्षेच्या ताफ्यातून गाडी उतरताच त्यांच्यासोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन ही देखील काळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसून आली. विजय यांच्यानंतर त्रिशानेही अजित कुमार यांची गळाभेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दोघेही एकाच गाडीतून अजित कुमार यांच्या घरी पोहोचल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, विविध चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्रिशा यांच्यातील कथित नातेसंबंधांबद्दल अनेक अफवा इंटरनेटवर फिरत आहेत, त्यातच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर आता पुन्हा एकदा दोघे या अत्यंत खाजगी भेटीत एकत्र दिसल्याने नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
अजित कुमार यांच्या आई मोहिनी मणी गेल्या काही काळापासून आजारी होत्या. तीन वर्षांपूर्वीच, म्हणजेच २०२३ मध्ये अजित कुमार यांच्या वडिलांचे (पी. सुब्रमण्यम) निधन झाले होते. त्यामुळे पाल छत्र गमावलेल्या अजित कुमार यांच्या पाठीशी संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टी खंबीरपणे उभी राहिली असून, कमल हासन, एम. के. स्टालिन यांच्यासह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त केले आहे. कौटुंबिक सूत्रांच्या माहितीनुसार, अंत्यसंस्कार अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडणार आहेत.




