राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय आणि मंत्रालय परिसरात झळकलेल्या काही बॅनर्सनंतर या चर्चांना अधिक वेग मिळाला आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज मुंबईत तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासोबतच आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना उमेदवारीसाठी आवश्यक एबी फॉर्म देण्यात येऊ शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
प्राजक्त तनपुरे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी हा एक महत्त्वाचा राजकीय धक्का ठरू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय निरीक्षकांमध्ये सुरू आहे.




