उपोषण सुटल्यानंतर रुग्णालयातूनच जरांगे पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप आणि नव्याने चौकशीची मागणी
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयातूनच घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला आहे. आंदोलनादरम्यान आपला घातपात करण्याचा गंभीर प्रयत्न झाला होता, असा आरोप करत त्यांनी आता या प्रकरणाचे मूळ शोधून काढण्याचा इशारा दिला आहे. हा संपूर्ण कट परळीच्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून रचला गेला होता, मात्र राज्यातील दोन सर्वोच्च नेत्यांनी मध्यस्थी करून त्या परळीच्या नेत्याचे नाव या प्रकरणातून जाणीवपूर्वक वगळल्याचा थेट आरोप जरांगे यांनी केला. “माझा घातपात करण्याचा प्रयत्न करणारा तो परळीचा नेता नेमका कोण होता? तो माझ्या जेवणात गोळ्या घालणार होता की कोणता दगाफटका करणार होता? हे जनतेसमोर आलेच पाहिजे.”
जरांगे पाटील यांनी या प्रकरणाची एसआयटी (SIT) किंवा सीआयडी (CID) मार्फत नव्याने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे एकत्र बसून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नाव दाबल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी केवळ नार्को टेस्टची इच्छा व्यक्त करणाऱ्या जरांगे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, संबंधित परळीचा नेता, स्वतः जरांगे आणि अटकेत असलेले तीन आरोपी या सर्वांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी ठाम मागणी केली आहे. प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्यापेक्षा पडद्यामागून ‘घोडे नाचवणारा’ मुख्य सूत्रधार जास्त महत्त्वाचा असून, आता हा विषय आपण तडीस नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.




