टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतरही कर्णधाराच्या फलंदाजीतील घसरणीमुळे बीसीसीआय चिंतेत; ऑलिम्पिक २०२८ डोळ्यासमोर ठेवून मोठ्या बदलाचे संकेत
भारतीय संघाने नुकताच टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला असला, तरी कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासाठी मात्र आगामी काळ आव्हानात्मक ठण्याची शक्यता आहे. विश्वचषक विजयाचा आनंद साजरा होत असतानाच, सूर्याच्या वैयक्तिक कामगिरीवर आणि सातत्याने कमी होत असलेल्या धावांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रिपोर्टनुसार, बीसीसीआयची निवड समिती आणि थिंक-टँक सूर्याच्या फॉर्मवर समाधानी नाही. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरत असून, त्याच्या फलंदाजीतील ती जुनी धार आता कमी झाल्याचे जाणवत आहे. या परिस्थितीमुळे २०२८ चे ऑलिम्पिक आणि पुढील विश्वचषकाचा विचार करता, भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वाची धुरा श्रेयस अय्यर याच्याकडे सोपवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
सूर्यकुमारच्या या खराब फॉर्ममागे केवळ मानसिक दडपण नसून, त्याच्या उजव्या मनगटाची गंभीर दुखापत हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आणि विश्वचषकादरम्यानही सूर्या मनगटावर जाड टेपिंग बांधून खेळताना दिसला होता. नेट प्रॅक्टिसपूर्वी त्याला विशेष डॉक्टरी उपचारांची गरज भासत असून, ही दुखापत आता त्याच्या शॉट्सवर आणि आक्रमकतेवर परिणाम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुलै २०२४ मध्ये कर्णधारपद मिळाल्यापासून त्याच्या धावगतीत मोठी घट झाली असून, ४५ सामन्यांमधील त्याची आकडेवारी त्याच्या प्रतिमेला साजेशी नसल्याचे निवडकर्त्यांचे मत आहे.
दुसरीकडे, श्रेयस अय्यर हा पुनरागमनासाठी सज्ज असून त्याच्याकडे नेतृत्वाचा दांडगा अनुभव आहे. मधल्या फळीत स्थिरता देण्याची त्याची क्षमता आणि शांत स्वभाव यामुळे निवड समिती त्याच्या नावाचा गांभीर्याने विचार करत आहे. सूर्याने जरी पुढील दोन वर्षे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी वाढते वय आणि फिटनेसच्या समस्या पाहता बीसीसीआय ‘मिशन २०२८’ साठी श्रेयसवर डाव लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेटमध्ये मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळू शकतात, ज्यामुळे क्रिकेट वर्तुळात आतापासूनच खळबळ माजली आहे.




