रोहित पवारांच्या ‘कामाख्या देवी’ आणि घराणेशाहीच्या टीकेलाही तटकरांचे सडेतोड उत्तर; ८ तारखेला राष्ट्रवादीचा राज्यसभा अर्ज भरणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आमदार रोहित पवार यांच्यावर पत्रकार परिषदेत अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. कोकणातील राजकीय घडामोडींवरून ठाकरेंचे खासदार विनायक राऊत यांनी, “बाळा माने यांनी २५ कोटी रुपये घेऊन विधान परिषदेची उमेदवारी मागे घेतली,” असा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपाचा कडक शब्दांत समाचार घेताना सुनील तटकरे म्हणाले, “विनायक राऊत हे नेहमीप्रमाणेच त्यांच्या पातळीवर जाऊन बोलले आहेत. एकेकाळी कोकण हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अभेद्य बालेकिल्ला होता. मात्र, आजच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कोकणात दोन अंकी संख्याही गाठता आलेली नाही. तुमचे मोजून अवघे ४५ मतदार उरले आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्यांवर खोटे आरोप करण्यापेक्षा, आपण खासदार म्हणून का अपयशी ठरलो आणि पक्षाची ही दुर्दशा का झाली, याचे आत्मपरीक्षण आधी विनायक राऊतांनी दूर्बिण घेऊन करावे.” कोकणात आता एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचाच भक्कम बालेकिल्ला तयार झाल्याचा दावा त्यांनी केला.
दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करून तटकरे यांच्यावर थेट घराणेशाहीची आणि अशोक खरात प्रकरणावरून टीका केली होती. “खरातसोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेल्यांपैकी एकाची पदं गेली, तर दुसऱ्याच्या घरात तिसरे पद आले,” असा टोला रोहित पवारांनी नाव न घेता लगावला होता. यावर प्रत्युत्तर देताना तटकरे कमालीचे आक्रमक झाले. “मी लोकसभेवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी असून पाच वेळा विधानसभेवर गेलो आहे. माझी कन्या अदिती तटकरे ही देखील दोनदा स्वतःच्या हिमतीवर निवडून आली आहे. आम्हाला मिळालेली पदे कोणाच्या मेहरबानीवर किंवा आयती मिळालेली नाहीत, तर त्यामागे आमचे अपार कष्ट आणि जनतेचा भक्कम पाठिंबा आहे,” असे सांगत त्यांनी घराणेशाहीचा आरोप फेटाळला. तसेच, “मी कधीही कामाख्या देवीच्या दर्शनाला कोणासोबत गेलेलो नाही. ज्यांची स्वतःची राजकीय दुर्दशा जनतेने केली आहे, ते नैराश्यातून अलीकडे भरकटलेल्या आणि केविलवाण्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करत आहेत,” असा सणसणीत टोला त्यांनी रोहित पवारांचे नाव न घेता लगावला.
राज्यसभेची ही जागा भाजप घेण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. येत्या ८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत घड्याळ चिन्हावर आमचा उमेदवार अर्ज दाखल करेल. उमेदवाराच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल. महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार (ज्यांची यादी रवींद्र चव्हाण, मी स्वतः आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर केली आहे) एकजुटीने लढणार असून यवतमाळची जागा बिनविरोध झाली आहे. विरोधकांची महाविकास आघाडी केवळ ‘नरेंद्र मोदी द्वेषाच्या काविळीमुळे’ एकत्र आली होती. अशी आघाडी फार काळ टिकत नसते. निवडणुकीनंतर त्यांची शकले उडणे स्वाभाविक आहे.
“माझ्या प्रदीर्घ राजकीय जीवनात मी नेहमीच संयम राखला आहे आणि कधीही वैयक्तिक किंवा टोकाची टीका केलेली नाही. लोकशाहीत प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे आणि जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहत आहे,” असे म्हणत तटकरे यांनी विरोधकांना मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला.




