वीज, वनसंज्ञा आणि आकारी पड प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आमदारांचे आश्वासन.
तब्बल सात ते आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर कुडाळ तालुक्याची आमसभा पार पडली असून, या सभेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रखडलेल्या प्रश्नांना वाचा फुटली आहे. आमदार निलेश राणे यांनी या सभेत आक्रमक पवित्रा घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “आमसभा ही ग्रामीण जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा असते, मात्र इतकी वर्षे ही सभा का झाली नाही, हा मोठा प्रश्न आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी यापुढील काळात जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या सभेत प्रामुख्याने वीज, रस्ते आणि वनविभागाच्या तक्रारींवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.
या सभेदरम्यान एका विभागाच्या अधिकाऱ्याकडे प्रश्नांची पुरेशी माहिती नसल्याचे समोर येताच आमदार राणे यांनी संताप व्यक्त केला. कामात कसूर करणाऱ्या आणि माहिती नसलेल्या संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी भर सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले. सभेमध्ये वीज वितरण विभागाच्या कामावर सुमारे सव्वा तास चर्चा झाली. तालुक्यातील सबस्टेशन, अंडरग्राउंड केबलिंग, पावसाळ्यापूर्वीची साफसफाई आणि देखभाल-दुरुस्तीबाबत प्रशासनाला कडक आदेश देण्यात आले आहेत. तसेच, सिंधुदुर्गातील संवेदनशील असलेल्या ‘आकारी पड’ आणि ‘वनसंज्ञा’ या प्रश्नावर आपण वनमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना निलेश राणे यांनी प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्याबाबतही सूचक विधान केले. “बच्चू कडू हे पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते आणि मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आता त्यांनी पुन्हा सोबत येण्याबाबतचा अंतिम निर्णय आमचे नेते शिंदे साहेबच घेतील. ते महायुतीत परत आले तर त्यांचे स्वागतच असेल,” असे राणे यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, विकासकामांचा आढावा आणि प्रशासनाला दिलेला दट्ट्या यामुळे कुडाळची ही आमसभा तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.




