राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे. सातारा आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सातारा शहरातील सदर बाजार आणि लक्ष्मी टेकडी परिसरात काल सायंकाळी जोरदार वादळ आणि पावसाने मोठा तडाखा दिला. वेगवान वाऱ्यांमुळे अनेक झाडे आणि वीज खांब घरांवर कोसळल्याने सुमारे 40 घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या छपरांचे पत्रे उडून गेले, तर वीजपुरवठाही खंडित झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. नुकसानग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बामनोली परिसरातील शिवसागर जलाशयात घडलेल्या बोट दुर्घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वादळी पावसात दोन पर्यटकांना घेऊन जाणारी बोट पाण्यात बुडाली. सुदैवाने दोन्ही पर्यटकांनी पोहत किनारा गाठत आपला जीव वाचवला. मात्र, बोट चालक रुपेश धोंडीबा तांबे हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
या घटनेनंतर सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले. दुसरीकडे परभणी जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे शेती, घरे आणि वीज यंत्रणांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या संकटात सापडला असून, प्रशासनासमोर मदत आणि पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.




