Jalgaon News : जळगाव शासकीय रुग्णालयाने कागदपत्र नसल्याने मृतदेह स्वीकारण्यास दिला नकार

spot_img

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. नियमित लसीकरणासाठी नेण्यात आलेल्या अवघ्या अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा लस दिल्यानंतर काही मिनिटांतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीयांना प्रशासनाकडून संवेदनशील वागणूक मिळण्याऐवजी शासकीय रुग्णालयाच्या कारभाराचा अमानवी चेहरा पाहायला मिळाल्याचा आरोप होत आहे.

टहाकळी प्रचा येथील जिल्हा परिषद शाळेत नियमित लसीकरण मोहीम सुरू होती. यावेळी सचिता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेला पोलिओसह इतर आवश्यक लसी देण्यात आल्या. मात्र लसीकरणानंतर अवघ्या दहा मिनिटांतच तिची प्रकृती अचानक बिघडली. बालिका निपचित पडल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने चाळीसगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. विशेष म्हणजे, सचिताचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात अयोध्या येथे देशसेवा बजावत आहेत.

यानंतर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. रात्री उशिरा आजोबा तुळशीदास मराठे मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले. मात्र काही तांत्रिक कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. “शवविच्छेदन सकाळी करा, पण मृतदेह किमान सुरक्षित ठेवा,” अशी विनंती कुटुंबीयांनी केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

परिणामी, एका वृद्ध आजोबांना आपल्या नातीचा मृतदेह रात्रभर मांडीवर घेऊन बसावे लागले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ