सातारा जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वीच महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होत असल्याचे दिसत आहे. शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी नुकतेच केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. “मी स्वतःच्या जोरावर निवडून येतो,” असे स्पष्ट सांगत त्यांनी आपली स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली आहे.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या सभेला महेश शिंदे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण मिळाले नसल्याने उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे गटातील अंतर्गत तणाव अधिक स्पष्ट झाला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या पोस्टरवर महेश शिंदे यांचा फोटो नसल्याने त्यांच्या नाराजीला आणखी खतपाणी मिळाले. या प्रकरणाचा रोख पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महेश शिंदे आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. 2019 पूर्वी भाजपमध्ये असलेले महेश शिंदे नंतर शिवसेनेत दाखल झाले होते. आता ते पुन्हा भाजपकडे वळण्याच्या शक्यतेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
या सर्व घडामोडींमुळे कोरेगाव तालुक्यातील राजकारणात महायुतीतील मतभेद उघडपणे दिसू लागले आहेत. आगामी काळात या राजकीय तणावाचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




