Sanjay Raut : राम मंदिरातील ‘त्या’ चोरीवरून संजय राऊतांचा भाजपवर थेट हल्ला; गझनवी आणि रावणाचा उल्लेख करत डागली तोफ!

spot_img

“कायदा फक्त विरोधकांसाठीच का?” – दानपेटी वाद आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

अयोध्या राम मंदिरातील दानपेटीतील कथित अफरातफरीच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. जे लोक प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानावर डल्ला मारतात, तेच आज विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. रावणामध्ये अनेक दुर्गुण असले तरी त्याने कधी दानपेटी लुटली नव्हती, असा टोला लगावत राऊतांनी इतिहासाचा दाखला दिला. मोहम्मद गझनवीने सोमनाथ मंदिर १७ वेळा लुटल्याचे आपण ऐकले आहे, पण भाजपच्या लोकांनी अयोध्येत अनेकदा लूट केली असून याचीही नोंद इतिहासात व्हायला हवी, असा घणाघाती वार त्यांनी केला.

यासोबतच, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था फक्त विरोधकांना लक्ष्य करण्यासाठीच वापरली जात असल्याचा उपरोधिक टोमणा त्यांनी मारला. सत्ताधारी पक्षातील लोकांवर कितीही गंभीर आरोप झाले, तरी त्यांना कायदा लागू होत नाही, असे राऊत म्हणाले. नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने महिन्याभरात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. यावर बोलताना ते म्हणाले की, हा निकाल जनतेच्या प्रचंड रोषामुळे आणि खटला वेगाने चालवल्यामुळे लागला आहे, यात सरकारचे कोणतेही शौर्य नाही. जर राज्यात कायद्याचा धाक आधीच असता, तर त्या बालिकेचे प्राण वाचले असते.

सध्या महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरलेले नाही, अशी टीका करत त्यांनी राज्यातील पेपरफुटीच्या प्रकरणांवरही बोट ठेवले. नीट (NEET), सीईटी (CET) आणि टीईटी (TET) परीक्षांचे पेपर फोडणारे थेट सत्ताधारी पक्षाशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ