रिध्दीमा कपूर साहनी आता अभिनय क्षेत्रात नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रसिद्ध कपूर कुटुंबातील सदस्य असलेल्या रिद्धीमाचा हा प्रवास विशेष चर्चेत आला आहे, कारण वयाच्या ४५व्या वर्षी ती पहिल्यांदाच कॅमेरासमोर उभी राहणार आहे. त्यामुळे कपूर कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, चाहत्यांमध्येही तिच्या पदार्पणाबाबत उत्सुकता वाढली आहे.
ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धीमाने आतापर्यंत सिनेसृष्टीपासून काहीसे अंतर राखले होते. तिचा भाऊ रणबीर कपूर मात्र बॉलीवूडमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून स्थिरावला आहे. तसेच रणबीरची पत्नी आलिया भट्ट हिनेही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रिद्धीमा सध्या ज्वेलरी डिझायनर म्हणून कार्यरत असून दिल्लीतील उद्योगपती भरत साहनी यांच्यासोबत तिचे लग्न झाले आहे. त्यांना समायरा नावाची मुलगी आहे. आता अभिनय क्षेत्रात पाऊल टाकताना ती उत्सुक असली तरी थोडीशी भावूक आणि नर्वस असल्याचे तिने सांगितले आहे.
सिनेसृष्टीत काम करण्यासाठी आई नीतू कपूर आणि भाऊ रणबीर कपूर यांनीच प्रोत्साहन दिल्याचे रिद्धीमाने स्पष्ट केले. “कॅमेरासमोर नैसर्गिक राहा आणि स्वतःसारखे वागा,” असा सल्ला त्यांनी दिल्याचे ती म्हणाली.
शूटिंगसाठी मुंबईत राहावे लागत असल्याने मुलगी दिल्लीत असल्याची खंतही रिद्धीमाने व्यक्त केली. मुलीपासून इतका काळ दूर राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याने भावनिक वाटत असल्याचे तिने सांगितले.
कपूर कुटुंबातील अनेक महिलांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच परंपरेत आता रिद्धीमाही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली असून, तिच्या या नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




