पुतीन यांची नाराजी, आर्मेनियाची युरोपशी जवळीक आणि भारताची ‘पिनाका’ मैत्री; जागतिक राजकारणात नवा पेच
रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही हे रणकंदन थांबण्याचे नाव घेत नाहीये. या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताकद लावूनही शांतता प्रस्थापित झालेली नसताना, आता रशियाने आणखी एका मित्र देशाला ‘नवीन युक्रेन’ बनवण्याचा गंभीर इशारा दिला आहे. हा देश म्हणजे सोव्हिएत युनियनचा एकेकाळचा भाग असलेला आर्मेनिया. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की यांच्याशी वाढती जवळीक रशियाला खटकली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी आर्मेनियाला स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, युरोपियन युनियनशी जवळीक वाढवणे आर्मेनियासाठी आत्मघातकी ठरू शकते. रशियाने आर्मेनियाचा उल्लेख ‘भावासारखा देश’ असा केला असला, तरी जेलेंस्कींसारख्या नेत्यांना साथ देणे म्हणजे रशियाविरोधी पाऊल असल्याचे म्हटले आहे.
आर्मेनिया आणि रशिया यांच्यातील दुराव्याची ठिणगी अजरबैजानसोबतच्या संघर्षामुळे पडली. १९९१ पासून सुरक्षेसाठी रशियावर अवलंबून असलेल्या आर्मेनियाला २०२० आणि २०२३ मध्ये नागोर्नो-काराबाख प्रांतावर अजरबैजानने केलेल्या हल्ल्यावेळी रशियाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. रशियन शांतता रक्षक दल तैनात असूनही अजरबैजानने तो भूभाग ताब्यात घेतल्याने १ लाखांहून अधिक आर्मेनियन लोकांना विस्थापित व्हावे लागले. “केवळ रशियावर अवलंबून राहणे ही आमची धोरणात्मक चूक होती,” असे विधान करत पाशिन्यान यांनी रशियाची साथ सोडण्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून आर्मेनियाने पश्चिमेकडील देशांकडे आणि युरोपियन युनियनकडे मदतीचा हात पुढे केला आहे, ज्यामुळे पुतीन प्रशासन प्रचंड संतापले आहे.
या संपूर्ण वादात भारताची भूमिका अत्यंत कळीची ठरली आहे. रशियाने साथ न दिल्यानंतर आर्मेनियाने भारतावर विश्वास टाकला आणि भारत आर्मेनियाचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार बनला. भारताने आर्मेनियाला ‘पिनाका’ रॉकेट लॉन्चर आणि इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवून ताकद दिली आहे. दुसरीकडे तुर्की, पाकिस्तान आणि अजरबैजान या देशांचा गट भारताच्या विरोधात सक्रिय आहे. भारतासाठी आता पेच निर्माण झाला आहे, कारण रशिया भारताचा पारंपरिक मित्र आहे, तर आर्मेनिया हा नवा विश्वासू सहकारी. रशियाने अजरबैजानच्या बाजूने झुकणे हे भारताच्या रणनीतीसाठी चांगले संकेत मानले जात नाहीत. आर्मेनियावर रशियाने आर्थिक किंवा लष्करी कारवाई केल्यास, भारत आपल्या या नव्या मित्राच्या पाठीशी कसा उभा राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




