आरसीबीचा विजयाचा ‘सिक्सर’ मारण्याचा इरादा; दिल्लीसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचे मोठे आव्हान
आयपीएलच्या १९ व्या मोसमात आज शनिवारी क्रिकेटप्रेमींना ‘डबल हेडर’चा थरार अनुभवायला मिळणार असून, पहिल्या लढतीत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगामात आरसीबीने आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकून ८ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, मुंबई आणि लखनौसारख्या बलाढ्य संघांना धूळ चारल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसरीकडे, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात संमिश्र झाली असून, सलग दोन विजयांतर त्यांना दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. आजच्या सामन्यात दिल्लीसमोर केवळ आरसीबीला रोखण्याचेच नाही, तर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचेही कठीण आव्हान असेल.
दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आरसीबीचे पारडे जड दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या ३३ सामन्यांपैकी १९ वेळा आरसीबीने बाजी मारली आहे, तर दिल्लीला १२ वेळा विजय मिळवता आला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्याकडून पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजीची अपेक्षा आहे. तर दिल्लीला जर विजयाच्या मार्गावर परतायचे असेल, तर त्यांच्या फलंदाजीला सातत्य राखावे लागेल आणि आरसीबीच्या आक्रमक फळीला रोखावे लागेल. गतविजेता आपला विजयाचा रथ पुढे नेणार की दिल्ली आश्चर्याचा धक्का देणार, याकडे आता तमाम क्रिकेट चाहत्यांचे डोळे लागले आहेत.




