Pune Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी नराधम बापाला जन्मठेप; जुन्नर न्यायालयाचा मोठा निर्णय

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे

जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका आरोपी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला आहे. राजेश रामदास नवले असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांत दोष सिद्ध झाल्याचे नमूद केले आहे. ही अत्यंत संतापजनक घटना १९ डिसेंबर २०२० रोजी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित मुलगी शाळेच्या मधल्या सुट्टीत दुपारच्या जेवणासाठी घरी आली असताना घरात इतर कोणी नसल्याची संधी आरोपीने साधली. त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून स्वतःच्या ९ वर्षीय मुलीला मारहाण केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी धक्कादायक बाब तपासात समोर आली.

या घटनेची माहिती मुलीच्या आईला मिळाल्यानंतर तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर ओतूर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला अटक केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात महत्त्वाचे पुरावे गोळा केले. त्यानंतर संपूर्ण दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. बी. शेलार यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपी राजेश नवले याला लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत जन्मठेपेची सक्त शिक्षा सुनावली आहे. तसेच दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. याशिवाय मारहाणीच्या गुन्ह्यातही स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस हवालदार देविदास खेडकर यांनी तपासाचे काम पाहिले, तर सरकारी बाजू अतिरिक्त सरकारी वकील जी. के. खोडे यांनी प्रभावीपणे मांडली.

या निकालामुळे बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत न्यायव्यवस्था कठोर भूमिका घेत असल्याचा स्पष्ट संदेश समाजात गेला असून, पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ