ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट विदेशी मद्याच्या अवैध व्यवसायावर मोठी कारवाई करत सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या बनावट मद्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून मुख्य आरोपीसह संबंधित आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शरद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी नारायणगाव विभागाचे पथक अवैध मद्यविक्रीविरोधी गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. जुन्नरमधील गणेशखिंड परिसरातून एका चारचाकी वाहनातून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ सापळा रचला.
जुन्नरकडून गणेशखिंडीच्या दिशेने येणारे वॅगनर वाहन अडवून त्याची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये चंदिगड राज्यासाठी तयार करण्यात आलेल्या लेबलांचा वापर करून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी वाहन चालक गोविंद शंकर जाधव (रा. निरगुडे, ता. जुन्नर) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून चौकशी केल्यानंतर शिरोली खुर्द येथे छापा टाकण्यात आला. तेथेही मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी मद्याचा साठा आणि मद्य भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. कारवाईत इम्पिरियल ब्लू, रॉयल स्टॅग आणि यूके नं. १ व्हिस्की या ब्रँडच्या नावाने विक्रीसाठी तयार केलेल्या शेकडो बनावट बाटल्या, कॅप्स, बुचे, एक मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सर्व साहित्याची किंमत सुमारे ४ लाख ५४ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला सुरुवातीला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तसेच बनावट मद्य तयार करण्यासाठी रिकाम्या बाटल्या पुरवणाऱ्या भंगार व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे करत आहेत. विभागाच्या या कारवाईमुळे बनावट मद्याच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.




