Petrol Diesel Price Hike : महागाईचा आणखी एक फटका! पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले

spot_img

देशात आधीच वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त असताना आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती, पुरवठ्यातील अनियमितता आणि अनेक ठिकाणी गॅससाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच इंधन दरवाढीमुळे वाहतूक आणि दैनंदिन खर्च आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे तसेच होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारावर परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा फटका तेल उत्पादक कंपन्यांना बसत असून त्याचा थेट परिणाम भारतातील ग्राहकांच्या खिशावर होत आहे. ताज्या दरवाढीनुसार देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सुमारे तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर 106.50 रुपयांवर पोहोचला असून डिझेलसाठी नागरिकांना 93 रुपये मोजावे लागत आहेत. पुण्यात पेट्रोल 106.95 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर अमरावतीमध्ये हा दर 108.24 रुपयांपर्यंत गेला आहे. रत्नागिरीत पेट्रोल 108.63 रुपयांवर पोहोचले असून नागपुरातही इंधन दर 107 रुपयांच्या पुढे गेले आहेत.

या दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहणार नसून वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा आणखी मोठा फटका नागरिकांना बसू शकतो.

दरम्यान, ही परिस्थिती फक्त भारतापुरती मर्यादित नसून आखाती देशांमधील तणावामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ