मुंबई आणि एमएमआर परिसरातील नागरिकांना वाढत्या महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आधीच इंधन, गॅस आणि दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमतींनी त्रस्त असलेल्या नागरिकांसमोर आता भाजीपाल्यांच्या दरवाढीचे नवे संकट उभे राहिले आहे. वाढते तापमान आणि बाजारातील घटलेला पुरवठा यामुळे अनेक भाज्यांच्या किमतींमध्ये सरासरी 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक गेल्या काही दिवसांत 20 ते 30 टक्क्यांनी घटल्याने बाजारातील दर झपाट्याने वाढले आहेत. फ्रेंच बीन्सचा दर तब्बल 200 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला असून, आठवडाभरापूर्वी हा दर 130 ते 170 रुपयांच्या दरम्यान होता. हिरवी मिरचीही 100 रुपयांवरून थेट 150 रुपये प्रतिकिलो झाली आहे. टोमॅटोच्या किमतींनीही दुप्पट उसळी घेतली असून, 25 रुपयांवर मिळणारे टोमॅटो आता 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.
याशिवाय लिंबू, कोथिंबीर, पापडी आणि फ्लॉवरसारख्या भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. काही भाज्यांचे दर 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचल्याने गृहिणींचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिकसारख्या प्रमुख भाजीपुरवठा करणाऱ्या भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटले आणि बाजारात तुटवडा निर्माण झाला.
दरम्यान, वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात हवामानात सुधारणा झाली नाही, तर भाजीपाल्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महागाईचा ताण येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.




