Mumbai : सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी ठाकरे गट आक्रमक

spot_img

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे आता प्रभादेवी परिसरातील नर्दुल्ला टँक मैदान चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या मैदानावर पार्किंगची व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मैदान वाचवण्यासाठी परिसरात मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

नर्दुल्ला टँक मैदान हे प्रभादेवी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. लहान मुलांचे खेळ, युवकांचे क्रीडा उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांची सकाळ-संध्याकाळची फेरफटका यासाठी हे मैदान कायम गजबजलेले असते. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांचेदेखील हे प्रमुख केंद्र राहिले आहे. त्यामुळे या मैदानावर पार्किंग उभारले गेल्यास परिसरातील नागरिकांच्या हक्काची मोकळी जागा कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने मैदान वाचवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. स्थानिक आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन मैदानाच्या संरक्षणासाठी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, आमचा विरोध सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पाला नसून मैदानाच्या जागेवर होणाऱ्या पार्किंगला असल्याचे महेश सावंत यांनी स्पष्ट केले. “विकास व्हायलाच हवा, मात्र नागरिकांच्या हक्काच्या मोकळ्या जागा हिरावून घेऊन तो होऊ नये. शिवसेना असताना मैदान बळकावण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

या मुद्द्यावरून आता स्थानिक राजकारण तापू लागले असून विकास आणि नागरिकांच्या सार्वजनिक हक्कांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ