Maharashtra Marathi Mandate : मराठीसाठी मनसेचा ‘खळबळजनक’ अंगावर येणारा पवित्रा; डोंबिवलीत रिक्षाचालकांचे धाबे दणाणले!

spot_img

१ मे पासून मराठी सक्तीचा निर्णय आणि परप्रांतीयांच्या ४ मे च्या संपावरून राजकारण पेटले; मनसे नगरसेवकांचा रस्त्यावर उतरून थेट इशारा

महाराष्ट्रातील मराठी भाषेचा स्वाभिमान आणि अस्मिता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. राज्य सरकारने येत्या १ मे पासून रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबेर चालकांसाठी मराठी बोलणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात वादाची ठिणगी पडली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) अंतर्गतच या मुद्द्यावरून जुंपली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मराठी सक्तीच्या भूमिकेवर ठाम असताना, त्यांच्याच पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवल्याने सत्ताधाऱ्यांमध्येच बेबनाव पाहायला मिळत आहे.

या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उडी घेतली असून, त्यांनी आपली आक्रमक शैली पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. परप्रांतीय रिक्षा संघटनांनी मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे रोजी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाला सडेतोड उत्तर देण्यासाठी मनसे आता रस्त्यावर उतरली आहे. डोंबिवलीत मनसेच्या नगरसेवकांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून रिक्षांवर ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते’ अशा आशयाचे स्टिकर्स लावून परप्रांतीय चालकांना कडक संदेश दिला आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर आता मनसेचे आजी-माजी नगरसेवक स्वतः स्टिकर मोहीम राबवत आहेत. डोंबिवली पश्चिमेत संदेश पाटील आणि रसिका पाटील यांनी कार्यकर्त्यांसह रिक्षांवर मराठीचे स्टिकर्स चिकटवले. “ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी बोलायची लाज वाटते, त्यांनी आपल्या बॅगा भराव्यात आणि सरळ आपल्या गावी निघून जावे,” अशा कडक शब्दात संदेश पाटील यांनी परप्रांतीयांना ठणकावून सांगितले आहे. ४ मे रोजीचा प्रस्तावित संप हाणून पाडण्याचा निर्धार मनसेने केल्यामुळे आता ४ तारखेला कल्याण-डोंबिवलीत मनसे विरुद्ध परप्रांतीय असा मोठा संघर्ष होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ