Devendra Fadnavis :’मुंबईत एकाच दिवसात ३५० झाडे कोसळली, दुपारनंतर ताशी ९० किमी वेगाने वारे वाहणार’ मुख्यमंत्र्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’चे आवाहन

spot_img

मानखूर्द दुर्घटना निसर्गामुळेच; मुंबई-पुणे महामार्गावरील परिस्थितीवर देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात स्पष्टीकरण

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात मुंबई आणि परिसरातील गंभीर परिस्थितीची माहिती दिली. मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सूनमध्ये सरासरी ८०० झाडे कोसळतात, मात्र काल केवळ एकाच दिवसात तब्बल ३५० झाडे उन्मळून पडल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सभागृहाला दिली. “आजचा दिवस यापेक्षाही अधिक आव्हानात्मक आणि गंभीर आहे. दुपारनंतर शहरात ताशी ७० ते ९० किलोमीटरच्या वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे झाडे पडण्याचा धोका जास्त असून, नागरिकांनी अत्यंत सावध राहावे,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. याच धोक्याचा विचार करून प्रशासनाने खाजगी कार्यालयांना शक्य तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याची विनंती केली आहे. अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये आणि विशेषतः तरुण वर्गाने अशा वादळी हवामानात पर्यटन (टूरिझम) पूर्णपणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, निसर्गाच्या प्रकोपामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. काल शहरात ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मानखूर्द येथे झालेली इमारत दुर्घटनेची घटना अत्यंत क्लेशदायक आहे. मात्र, ती कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती. दुर्दैवाने, या इमारतीमधील लोकांचा नाही, तर ती इमारत शेजारील ज्या झोपडीवर कोसळली, त्यातील निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या संपूर्ण महानगरपालिका, आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आणि सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरून या आपत्तीचा सामना करत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ (कनेक्टिंग लिंक) वर दरड कोसळल्याची घटना घडताच यंत्रणा तात्काळ सज्ज झाली होती. तिथे जास्त लोक अडकले नव्हते, तात्काळ वाहतूक वळवून गाड्या बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले.

प्रशासनाच्या पूर्वतयारीचा पाढा वाचताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मदतकार्यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः रात्री १ वाजता मानखूर्द येथे उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. झालेल्या दुर्घटनांवर आधीच योग्य ती कार्यवाही आणि पूर्वतयारी करण्यात आली होती. “मला या संकटसमयी कोणतेही राजकीय भाष्य करायचे नाही, कारण राजकारणाने गेलेले निष्पाप जीव परत आणता येत नाहीत,” असे फडणवीस म्हणाले. आज परिस्थिती हाताळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने, अर्धवट माहिती देण्याऐवजी संपूर्ण तयारी करून उद्या या संदर्भात सरकारचे सविस्तर आणि अधिकृत निवेदन सभागृहासमोर मांडणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना शांत केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ