मिसिंग लिंकवर वाहतूक विस्कळीत; अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले तर काहींचा प्रवास अर्धवट अंतरावरच थांबवला
मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून मुंबई आणि पुणे पट्ट्यात पावसाचा जोर अत्यंत वाढल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला असून मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या भागात दरड कोसळल्याची घटना घडली असून महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
दुसरीकडे, रेल्वे वाहतुकीलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या मंकी हिल घाट सेक्शनमध्ये अचानक दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या १६ महत्त्वाच्या रेल्वे गाड्या प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या आहेत. यामध्ये इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस यांसारख्या दररोज हजारो प्रवासी वाहून नेणाऱ्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. तसेच धुळे-मुंबई एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.
घाटातील या बिघाडामुळे रेल्वे प्रशासनाने ६ गाड्या इतर मार्गांवर वळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अहमदाबाद-कोल्हापूर एक्सप्रेस, इंदूर-दौंड एक्सप्रेस आणि दुरंतो एक्सप्रेस आता कल्याण-इगतपुरी-मनमाड-दौंड मार्गे चालवल्या जात आहेत. तर बिदर एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस आणि चेन्नई एक्सप्रेस या गाड्याही दौंड-मनमाड-इगतपुरी-कल्याण मार्गे वळवण्यात आल्या आहेत. लिंगमपल्ली-इंदूर हमसफर एक्सप्रेस आता दौंड-मनमाड-जळगाव-सुरत मार्गे धावणार आहे.
याशिवाय, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक गाड्यांचा प्रवास अर्धवट अंतरावरच थांबवण्यात आला आहे (Short Terminate). संत्रागाछी-पुणे हमसफर एक्सप्रेस आता पुणे ऐवजी पनवेल येथेच थांबवली जाईल. सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मुंबईला न जाता पुणे स्थानकावरच आपली सफर संपवतील. हैदराबाद-मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस देखील पुण्यातच थांबवली जाईल आणि ती पुढे मुंबईऐवजी पुण्यातूनच (Short Originate) हैदराबादसाठी रवाना होईल. मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस देखील मुंबईऐवजी पुणे स्थानकावरूनच पुढे धावणार आहे.
रेल्वेच्या वेळापत्रकातही मोठे बदल करण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या गाड्या त्यांच्या निश्चित वेळेपेक्षा ३ तास उशिराने सुटणार आहेत. तसेच मुंबई-जालना/नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत २ तासांचा बदल करण्यात आला असून, ही गाडी दुपारी १३:१५ ऐवजी दुपारी १५:१५ वाजता सुटेल. घाटातील दरड हटवून मार्ग लवकरात लवकर मोकळा करण्यासाठी रेल्वेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




