Crime News : देशात मोठ्या बॉम्बस्फोटाचा कट उधळला; ‘गजवा-ए-हिंद’ प्रेरित नेटवर्कचा पर्दाफाश

spot_img

देशात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ला घडवण्याचा गंभीर कट सुरक्षा यंत्रणांनी वेळेत उधळून लावला आहे. ‘गजवा-ए-हिंद’ या अतिरेकी विचारसरणीने प्रभावित असलेल्या एका गुप्त नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला असून, चार राज्यांतून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मुंबई आणि ठाणे येथील दोन प्रमुख संशयितांना पकडण्यात आले असून, या अटकेनंतर संपूर्ण कट उघडकीस आला.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने समन्वय साधत मुंबई, ठाणे, ओडिशा आणि बिहारमध्ये एकाच वेळी छापेमारी केली. तपासात असे समोर आले की, आरोपी भारतात कट्टरपंथी विचारसरणी पसरवण्याच्या उद्देशाने सक्रिय होते. ते केवळ स्वतः हल्ल्याची तयारी करत नव्हते, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर तरुणांनाही प्रभावित करून या जाळ्यात ओढत होते.

ठाण्यात अटक करण्यात आलेला मोसाईब अहमद उर्फ सोनू उर्फ कलाम हा या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे समोर आले आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी असून तांत्रिक बाबींमध्ये पारंगत होता. स्फोटके तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. विशेष म्हणजे, रिमोट-कंट्रोलद्वारे चालणारी स्फोटके तयार करण्याचे काम तो करत होता. तो ठाण्यात मेकॅनिक म्हणून काम करत होता आणि यापूर्वी परदेशातही कामाचा अनुभव त्याला होता.

मुंबईत राहणारा बारावीचा विद्यार्थी मोहम्मद हम्माद हा या कटात लॉजिस्टिक सहाय्य पुरवत होता. त्याने स्फोटकांसाठी लागणारे साहित्य, जसे की बॉल बेअरिंग्ज, खिळे आणि रिमोटवर चालणारी खेळणी यांची जमवाजमव करून मुख्य आरोपीपर्यंत पोहोचवली होती. या गटातील सदस्य एन्क्रिप्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संवाद साधत आणि स्फोटक यंत्रणांचे फोटो शेअर करत होते.

या नेटवर्कचे धागेदोरे ओडिशा आणि बिहारपर्यंत पोहोचले आहेत. भुवनेश्वरमधून अटक करण्यात आलेल्या संशयिताने दिल्लीतील संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली होती. तर बिहारमधील आणखी एक आरोपी सोशल मीडियाद्वारे तरुणांना भडकवणे आणि निधी गोळा करण्याचे काम करत होता.

तपासादरम्यान असेही समोर आले की, या गटाचे संभाव्य लक्ष्य महत्त्वाची धार्मिक स्थळे, सरकारी इमारती आणि लष्करी तळ होते. सध्या सर्व आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, त्यांच्या इतर संपर्क आणि आर्थिक स्रोतांचा मागोवा घेतला जात आहे. सुरक्षा यंत्रणांच्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ