मंत्रिपदाच्या अटीवर दिल्लीचा नकार; राजेंद्र जैन यांच्या अर्जावेळी भुजबळांची ‘नाराज नाही’ म्हणत सूचक फटकेबाजी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव निश्चित मानले जात असतानाच, ऐनवेळी धक्कादायक घडामोडी घडून राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या राजकीय भूकंपामागे भुजबळांनी ठेवलेली एक मोठी अट कारणीभूत ठरल्याचे सूत्रांकडून समजते. भुजबळ हे स्वतः राज्यसभेवर जाण्यास तयार होते, मात्र त्यांनी स्वतःचे राज्यातील मंत्रिपद समीर भुजबळ यांना देण्याची मागणी केली होती. या प्रस्तावावर राज्य पातळीवरून संमती मिळवण्याचा प्रयत्न झाला, परंतु दिल्लीतील भाजप हायकमांडने या अटीला थेट ‘रेड सिग्नल’ दिला. केंद्राकडून तातडीने मंत्रिपद देण्यास नकार आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने छगन भुजबळ यांना डावलून प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात छगन भुजबळ तीव्र नाराज असल्याच्या चर्चांना मोठे उधाण आले होते.
या संपूर्ण नाट्यमय घडामोडींवर अखेर छगन भुजबळ यांनी आपली पहिली सविस्तर आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्याला दिल्लीत (राज्यसभा किंवा लोकसभा) जाण्याची इच्छा असल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, यापूर्वी चार ते पाच वेळा अशी संधी चालून आली होती, परंतु दुर्दैवाने ती हुकली; मात्र यावेळी संसदेत जाण्याचा विचार नक्कीच होता. पक्षात चालणाऱ्या घराणेशाहीच्या आणि सत्तेच्या समीकरणांवर बोट ठेवत त्यांनी मकरंद पाटील, सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्या कुटुंबाचे दाखले दिले. या सर्व नेत्यांचे नातेवाईक मंत्री, खासदार किंवा आमदार पदांवर कार्यरत असताना, तोच समान न्याय आपल्याला आणि आपल्या कुटुंबालाही लागू व्हावा, अशी थेट विनंती आपण वरिष्ठ पातळीवर केल्याचे भुजबळांनी उघडपणे सांगितले.
भाजपकडून मिळालेल्या नकारावर स्पष्टीकरण देताना त्यांनी मित्रपक्षाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. भाजपसोबतच्या प्रस्तावावर आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेवर कम्युनिकेट करायला कदाचित वेळ लागला असावा, असे सांगत त्यांनी भाजपच्या नकाराच्या चर्चा फेटाळून लावल्या. आपण नाराज नसल्याचे सांगतानाच, “इतरांना जो न्याय मिळाला, तोच मलाही मिळावा ही मागणी अन्यायकारक कशी असू शकते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वतःच्या राजकीय भूमिकेवर बोलताना त्यांनी अत्यंत सूचक विधाने केली. “अरे हमने कहां ना हम कबड्डी के प्लेअर है, शतरंज के खिलाडी नही है.. आज नाही तर उद्या, कधी ना कधी न्याय मिळेलच,” अशा शब्दांत त्यांनी भविष्यातील लढवय्यी वृत्ती अधोरेखित केली. दरम्यान, आज राजेंद्र जैन यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत स्वतः छगन भुजबळही आवर्जून उपस्थित होते. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना राजेंद्र जैन यांनी भुजबळांचे पाय शिवून घेतलेला आशीर्वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.




