Bacchu Kadu : “आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच!”; बच्चू कडूंचा भाजपला थेट इशारा, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत व्यक्त केली भीती

spot_img

शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेले प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू सध्या महायुतीत राहूनही भाजपला सातत्याने लक्ष्य करत आहेत. नुकत्याच माध्यमांशी बोलताना त्यांनी आगामी राजकीय गणितांवर मोठे विधान केले असून, “आमच्या मनातील मुख्यमंत्री केवळ एकनाथ शिंदे हेच आहेत आणि २०२९ मध्ये त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना त्यांनी, “देवेंद्र फडणवीस यांनी आता देशाच्या सर्वोच्च पदी जावे, ‘देवाभाऊंचे’ प्रमोशन व्हावे,” असा खोचक सल्लाही दिला, ज्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महायुतीमधील अंतर्गत धुसफुस आणि जागावाटपाच्या सुप्त संघर्षावर बोलताना बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ते म्हणाले की, “२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा दगाफटका झाला होता, त्यामुळे राजकारणात पुन्हा तसा दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज भाजप स्वतः स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत आहे, तर आम्हीही आमची स्वतंत्र तयारी करत आहोत.” त्यांच्या या विधानामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे आणि भाजपविषयी शिंदेंच्या शिवसेनेत अविश्वासाचे वातावरण असल्याचे स्पष्ट अधोरेखित होत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच ठाणे-नवी मुंबई जिल्ह्यात डावलण्यात आल्याच्या चर्चेवरही बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिले. या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून शिंदे नाराज असल्याच्या वृत्तावर बोलताना कडू म्हणाले की, “डावलून शिवसेना कधीही थांबणार नाही, ही वाघाची सेना आहे आणि सेना कधी झुकत नसते. जर कोणी चुकूनही शिवसेनेला डावलण्याचा किंवा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, तर येणाऱ्या काळात त्यांना त्याचे परिणाम आणि तसे दिवस नक्कीच बघायला मिळतील,” असा थेट आणि गंभीर इशारा त्यांनी मित्रपक्ष भाजपला दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ