हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जाणारा अधिकमास यंदा सुरू झाला असून देशभरातील भाविकांमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. साधारणपणे दर तीन वर्षांनी येणाऱ्या या महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ किंवा ‘मलमास’ असेही संबोधले जाते. धार्मिक मान्यतेनुसार हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. त्यामुळे या काळात विष्णू भक्ती, जप, पूजा आणि दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते.
धर्मग्रंथांनुसार, अधिकमासात सात्विक जीवन जगणे आणि मन, वाणी व आचरण शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. या महिन्यात विष्णू सहस्रनाम पठण, भागवत पुराण वाचन किंवा “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप केल्यास पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. अनेक भाविक या काळात उपवास, भजन-कीर्तन आणि मंदिर दर्शनालाही प्राधान्य देतात.
याशिवाय गरजूंना धान्यदान, वस्त्रदान आणि अन्नदान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अधिकमासात केलेले दान आणि सेवा अनेकपटींनी फळ देते. त्यामुळे अनेक जण या महिन्यात सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात.
मात्र, अधिकमासाला ‘मलमास’ असेही म्हटले जात असल्याने काही शुभ कार्ये या काळात टाळली जातात. विवाह, गृहप्रवेश, मुंज, बारसे, नवीन घर किंवा वाहन खरेदी यांसारखे मांगलिक कार्यक्रम या महिन्यात करण्यास धार्मिक परंपरेत मनाई आहे. तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा नवे व्रत सुरू करणे टाळावे, असेही सांगितले जाते.
धार्मिक तज्ज्ञांच्या मते, अधिकमास हा आत्मचिंतन, संयम आणि भक्तीचा काळ मानला जातो. या महिन्यात राग, वादविवाद, अहंकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मकता आणि शांतता जपणे अधिक महत्त्वाचे मानले जाते.




