“पुढे काय होईल कोणाला माहीत?” म्हणत अरिजीतने दिला सूचक इशारा; प्लेबॅक सिंगिंगमध्ये पुन्हा परतणार असल्याच्या चर्चांना उधाण
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने सुमारे महिन्याभरापूर्वी प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना मोठा धक्का दिला होता. मात्र, आता त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर केलेल्या एका प्रदीर्घ पोस्टमुळे त्याच्या पुनरागमनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अरिजीतने आपल्या पोस्टची सुरुवातच “हा मेसेज फक्त माझ्या खऱ्या श्रोत्यांसाठी आहे” अशी करत चाहत्यांशी संवाद साधला. या क्रूर जगात चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने आभार मानले असून, सध्या नवीन गाणी स्वीकारणे बंद केल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
अरिजीतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी नवीन कामे स्वीकारणे थांबवले असले तरी, माझ्याकडे जुन्या गाण्यांची मोठी यादी शिल्लक आहे. ही अपूर्ण गाणी पूर्ण होईपर्यंत पुढील वर्षभर किंवा त्याहून अधिक काळ रिलीज होत राहतील.” याचसोबत त्याने चाहत्यांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा, वाचन करण्याचा आणि मेडिटेशन (ध्यान) करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने विशेषतः शरीरातील ‘स्पाइक प्रोटीन’ काढून टाकण्याबाबत आणि ५ ग्रॅमचा नियम पाळण्याबाबत काही तांत्रिक गोष्टीही नमूद केल्या आहेत.
या संपूर्ण पोस्टमध्ये अरिजीतने शेवटी जे लिहिले, त्यानेच खऱ्या अर्थाने खळबळ उडवून दिली आहे. त्याने शेवटी लिहिले, “पुढे काय होईल कोणाला माहीत?” (Who knows what’s next?). या एका वाक्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अरिजीतने आपला निवृत्तीचा निर्णय कायमचा नसून तो भविष्यात पुन्हा गाणी गाऊ शकतो, असा अंदाज नेटकरी लावत आहेत.
२८ जानेवारी रोजी त्याने जेव्हा संन्यास घेण्याची घोषणा केली होती, तेव्हा संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली होती. मात्र, त्याच्या या ताज्या पोस्टमुळे चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या लाडक्या गायकाचा आवाज ऐकायला मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.




