spot_img

Ajit Pawar Plane Crash : बारामतीजवळील विमान दुर्घटनेवर संशयाचे सावट; CID आणि AAIB कडून दुहेरी तपास

spot_img

घातपात की तांत्रिक बिघाड? ब्लॅकबॉक्स ताब्यात, विरोधकांचे थेट सवाल

बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या घटनेने केवळ राजकीयच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

या अपघातामागे नेमकं कारण काय, याबाबत विविध तर्क मांडले जात असून काहींनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाढत्या संशयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हवाई उड्डाण मंत्रालयाने तात्काळ तपास सुरू केला आहे.

विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडून तीन सदस्यीय पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमानाची तांत्रिक स्थिती, उड्डाणावेळीची ऑपरेशनल माहिती, पायलटचे निर्णय, तसेच घटनास्थळावरील परिस्थिती यांचा कालबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अपघाताच्या वेळी बारामती परिसरात दृश्यमानता कमी होती, त्यामुळेच दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दूरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत असल्याचा उल्लेख करत, “जर धुकं इतकं दाट होतं, तर इतक्या अंतरावरून विमान कसं दिसतं?” असा सवाल उपस्थित केला आहे.

यासोबतच त्यांनी सत्ताधारी आघाडीतील नेत्यांच्या मौनावरही टीका केली आहे. अजितदादांच्या पक्षातील प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते या विषयावर स्पष्ट भूमिका का मांडत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जनतेतील संभ्रम दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. केंद्राच्या तपासासोबतच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) यांच्याकडेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या अपघाताचा तपास विविध अंगांनी होणार असून, नेमकी चूक तांत्रिक होती की मानवी निष्काळजीपणा कारणीभूत होता, की अन्य काही बाबी समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ