राजकारण म्हणजे संघर्षाचं रणांगण. पण कधी कधी या रणांगणावर असे काही योद्धे येतात, जे आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात. महाराष्ट्राच्या मातीने अनेक दिग्गज नेते पाहिले, पण नियतीचा खेळ असा की राज्याला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता असणारे काही हिरे आपल्यातून अकाली निघून गेले. अशा नेत्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या पक्षाचेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. आज आपण महाराष्ट्राच्या अशाच 5 नेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला.
या यादीतील पहिलं नाव म्हणजे ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे. 3 जून 2014… हा दिवस भाजप कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बीडच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले गोपीनाथ मुंडे संघर्षातून मोठे झाले. महाराष्ट्रात युतीचं सरकार आणण्यात आणि ओबीसी राजकारणाला चेहरा देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते केंद्रात ग्रामविकास मंत्री झाले आणि अवघ्या आठवड्याभरातच ही दुःखद बातमी आली. दिल्लीत विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गाडीला एका दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली. वरवर हा अपघात किरकोळ वाटत होता, पण अंतर्गत जखमांमुळे आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याने आपला बुलंद आवाज गमावला. त्यांच्या मृत्यवरुन राज्यात मोठे वादळ उठले होते. काही जणांनी गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली असेही आरोप केले होते.
गोपीनाथ मुंडे यांचे मित्र आणि मेहुणे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्वात महत्त्वाचे नेते म्हणजे प्रमोद महाजन. त्यांना ‘किंगमेकर’ म्हटलं जायचं. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपमध्ये सर्वाधिक वजन असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. तंत्रज्ञान आणि राजकारण यांची सांगड घालण्यात ते निष्णात होते. 22 एप्रिल 2006 रोजी संपूर्ण देश हादरला, जेव्हा त्यांचेच सख्खे भाऊ प्रवीण महाजन यांनी कौटुंबिक वादातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 3 मे 2006 रोजी महाजन यांची प्राणज्योत मालवली. जर आज प्रमोद महाजन असते, तर देशाचं आणि राज्याचं राजकारण कदाचित वेगळं असतं, अस काही जण म्हणतात.
पुढचं नाव आहे महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख. लातूरच्या बाभळगावचा हा सरपंच थेट राज्याचा मुख्यमंत्री झाला, हा प्रवास आजही अनेकांना प्रेरणा देतो. विलासराव त्यांच्या हजरजबाबीपणासाठी आणि दिलदार स्वभावासाठी ओळखले जायचे. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. काँग्रेस पक्षाचा हा एक असा चेहरा होता, ज्याचा आदर सर्वपक्षीय नेते करायचे. मात्र विलासरावांना जास्त वेळ मिळाला नाही. यकृत आणि मूत्रपिंडाच्या विकाराने (Liver and Kidney failure) त्यांना ग्रासले होते. चेन्नईच्या रुग्णालयात 14 ऑगस्ट 2012 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील एक ‘रॉयल’ पर्व संपलं.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव आणि सहकार क्षेत्रातील महामेरू म्हणून डॉ. पतंगराव कदम यांची ओळख होती. पुण्यात एका छोट्या खोलीत त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था आशियातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असून तिची ७८ पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. पतंगराव कदम यांना किडनी (मूत्रपिंड) आणि यकृताचा (Liver) गंभीर आजार जडला होता. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांना ‘मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’ झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा आधारस्तंभ गमावला. त्यांच्या अंत्यसंस्काराला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो जनसमुदाय लोटला होता, जे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक होते.
सांगलीच्या मातीतला एक अत्यंत साधा माणूस जेव्हा गृहमंत्री होतो, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था कशी असावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर.आर. पाटील, म्हणजेच राजकारणातले आबा. डान्स बार बंदीचा धाडसी निर्णय असो किंवा ‘गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान’, आबांनी नेहमीच जमिनीवरची कामं केली. ‘मिस्टर क्लीन’ अशी त्यांची ओळख होती. सतत तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे त्यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. खूप प्रयत्न करूनही 16 फेब्रुवारी 2015 रोजी अवघ्या 57 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ‘आबा, पुन्हा या’ ही भावना आजही सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात कायम आहे.
शिवसेनेचा उल्लेख ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजे ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे. सामान्य लोकांच्या न्याय-हक्कासाठी धावून जाणारा हा नेता होता. ठाण्यात शिवसेना घराघरात पोहोचवण्यात दिघेंचा सिंहाचा वाटा होता. त्यांची राहणी साधी पण दरारा मोठा होता. आजही त्यांना ‘धर्मवीर’ म्हणून पूजलं जातं.” 26 ऑगस्ट 2001 रोजी एका विमान अपघातानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेला उद्रेक सर्वांनी पाहिला आहे. आजही त्यांच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा होतात, पण महाराष्ट्राने एक धाडसी नेतृत्व गमावलं हे मात्र सत्य.”
यांशिवाय विनायक मेटे, मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप किंवा अलीकडेच झालेले बाबा सिद्दिकी अशा अनेक नेत्यांच्या अकाली निधनाने राज्याचं नुकसान झालं आहे.अजितदादा पवार यांच्या अकाली मृत्यूने तर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. हे सर्व नेते आपल्यातून गेले असले, तरी त्यांनी केलेली कामं आजही लोकांच्या लक्षात आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम लक्षात राहतील.




