18 जानेवारी 2026 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एक थरारक घटना घडली होती. स्वाती इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘नालंदा’ इमारतीत पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेमुळे ओशिवारा परिसरात मोठी खळबळ उडाली असून फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्तीचे नाव समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळालं. ओशिवारा गोळीबार प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता आणि रिव्ह्यूअर कमाल आर खान (KRK) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कमाल आर खान याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ओशिवारा येथील नालंदा इमारतीमध्ये हा गोळीबार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका मॉडेल आणि लेखकाच्या घराच्या दिशेने अज्ञात इसमाने गोळी झाडली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत होते.पोलिसांनी या संपूर्ण घटनेमागे फिल्म इंडस्ट्रीचा अँगल असल्याचं म्हटलं आहे. प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे दुवे हाती लागल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा कमाल आर खानकडे वळवला. काल रात्री उशिरा पोलिसांनी केआरकेला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या गोळीबाराचा मास्टरमाइंड नेमका कोण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.




