निवडणुकीतील आरोपांनंतरही मनसे-शिंदे सेनेची जवळीक; आकडेमोड आणि गोंधळ थांबवण्यासाठी निर्णय – राजू पाटील
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलताना दिसत असून, महापौर पदाच्या आरक्षण सोडतीआधीच मोठी राजकीय हालचाल घडली आहे. गुरुवारी (22 जानेवारी) 29 महापालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची घोषणा होणार असतानाच, मनसेने कल्याण-डोंबिवली महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक काळात शिंदे गटाच्या शिवसेनेवर जोरदार टीका करणाऱ्या मनसेने अचानक पाठिंबा जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे नेते राजू पाटील आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची बुधवारी (21 जानेवारी) भेट झाली. या भेटीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेने आम्हाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राजू पाटील यांनीही याबाबत आपली भूमिका मांडली.
मनसेच्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना राजू पाटील म्हणाले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली आकडेमोड, नगरसेवकांची पळवापळवी आणि राजकीय अस्थिरता कुठेतरी थांबायला हवी होती. पुढील काळात समित्या आणि विविध कमिट्यांच्या निवडणुका होणार असून, अशा वेळी अधिक गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून एक बाजू स्थिर राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र असल्याने, त्यांना पाठिंबा देऊन आम्ही सत्तेच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतल्याचंही राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. मनसेला या पाठिंब्याच्या बदल्यात काय मिळणार, या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, “आम्हाला काहीही वैयक्तिक मिळवायचं नाही. सत्तेत राहून जर विकासकामं झाली, तर तेवढंच आमच्यासाठी पुरेसं आहे.”
तसेच, निवडणुकीदरम्यान मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र लढा दिला होता. मात्र निकालानंतर काही नगरसेवक गायब झाल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली. अशा वेळी केवळ मनसेच नव्हे, तर ठाकरे गटातील नगरसेवकांचीदेखील चिंता असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचं पाटील यांनी सांगितलं.
“केडीएमसीची जनता या राजकारणाला कंटाळली आहे. आणखी गोंधळ होऊ नये, हा आमचा मुख्य हेतू आहे. हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणूक निकालानंतर संपूर्ण गणित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आलं होतं. त्यानंतर स्थानिक पातळीवर नगरसेवकांच्या मतानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मिळाल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
निवडणुकीत महायुतीवर आणि स्थानिक भ्रष्टाचारावर टीका केली होती, मग आता शिंदे सेनेला पाठिंबा का, या प्रश्नावर राजू पाटील म्हणाले की, “पाच नगरसेवक घेऊन आम्ही जनतेला न्याय देऊ शकत नव्हतो. सत्तेबाहेर राहून फक्त आरोप करण्यापेक्षा सत्तेत राहून अंकुश ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. आमचे मुद्दे आणि कॉमन मिनिमम प्रोग्रॅम घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत.”
निवडणुकीदरम्यान काही जागा पडल्या, नाराजी होती; मात्र आता त्या गोष्टी कुरवाळण्याची वेळ नसल्याचं सांगत, मनसेने शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यामागचं कारण राजू पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.




