“पतंगामुळे महाराष्ट्र हादरला” नवनिर्वाचित नगरसेविकेचा थेट हल्ला
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडले, तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. महापालिका निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय समीकरणे बदलताना दिसली. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युतीत निवडणुका लढवल्या, मात्र अजित पवार यांनी भाजपची साथ सोडत थेट शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मोठा फटका अजित पवार (Ajit Pawar) गटाला बसला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
या निवडणुकांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार अनेक पक्षांनी स्वतंत्रपणे किंवा युतीत निवडणुका लढवल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले. मुंब्रा परिसरात गेली अनेक वर्षे जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी त्या वर्चस्वाला गंभीर आव्हान निर्माण झाले आहे.
मुंब्रामध्ये AIMIM पक्षाने जोरदार मुसंडी मारत महापालिकेत प्रवेश केला असून, थेट AIMIMकडून निवडणूक लढवून सहर शेख या तरुणीने नगरसेविका म्हणून विजय मिळवला आहे. या विजयासोबतच सहर शेखने केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सहर शेख म्हणाली, “AIMIMच्या पतंगाचा रंग हिरवा आहे आणि संपूर्ण मुंब्राचा रंग हिरवा करण्याचा माझा संकल्प आहे.” तिच्या या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिने पुढे दावा केला की, “AIMIMच्या पतंगामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.”
आपल्या उमेदवारीबाबत बोलताना सहर शेखने जितेंद्र आव्हाडांवर थेट आरोप केले. “माझे वडील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षासाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. सुरुवातीला माझे नाव जाहीर करण्यात आले, आम्ही मुंब्रात सर्वात मोठी रॅली काढली, तरीही पक्षाकडून एबी फॉर्म दिला जात नव्हता,” असे ती म्हणाली.
“शेवटपर्यंत जितेंद्र आव्हाड उमेदवारी देण्याचे आश्वासन देत होते, मात्र त्यांनी शब्द पाळला नाही. जर आम्ही त्यांना आव्हान दिले नसते, तर ते चुकीचे ठरले असते आणि अल्लाहला काय उत्तर दिले असते?” असा सवालही तिने उपस्थित केला.
शेवटच्या क्षणांचा उल्लेख करताना सहर शेख म्हणाली, “माझ्यासमोर अजित पवार गटाचा एबी फॉर्म आणि AIMIMचा फॉर्म दोन्ही होते. मात्र अजित पवार गट भाजपासोबत असल्याने, अल्लाहचा संदेश समजून मी AIMIMचा एबी फॉर्म स्वीकारला.”
मुंब्रातील या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी आगामी काळात राजकीय आव्हाने वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.




