spot_img

Election Ink : जगभरात पोहोचणाऱ्या ‘इंडेलिबल इंक’मागचं भारतीय रहस्य

spot_img

डाव्या हाताच्या बोटावर लावली जाणारी ही जांभळी शाई कुठे तयार होते, कशी काम करते आणि का पुसली जात नाही?

निवडणुकीत मतदान केल्यानंतर डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाणारी जांभळी शाई म्हणजेच ‘इंडेलिबल इंक’ हा मतदान केल्याचा ठोस पुरावा मानला जातो. या शाईमुळे एकाच व्यक्तीने पुन्हा मतदान करणं अशक्य होतं. सुरुवातीला जांभळ्या रंगाची दिसणारी ही शाई काही वेळातच काळी पडते आणि अनेक दिवस त्वचेवर तशीच राहते.

विशेष म्हणजे ही शाई केवळ भारतापुरती मर्यादित नाही. जगातील जवळपास 90 देशांमध्ये मतदानानंतर याच शाईचा वापर केला जातो. त्यापैकी अनेक देश भारतातूनच ही शाई आयात करतात. भारतात ही अमिट शाई प्रामुख्याने दोन ठिकाणी तयार होते—हैदराबादमधील रायुडू लॅबोरेटरी आणि कर्नाटकातील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड. देशांतर्गत बहुतांश निवडणुकांसाठी निवडणूक आयोग म्हैसूर पेंट्सची शाई वापरतो, तर रायुडू लॅबोरेटरीकडून ही शाई इतर देशांना पाठवली जाते.

पूर्वी ही शाई छोट्या बाटल्यांमधून निर्यात केली जायची. मात्र 2014 नंतर तंत्रज्ञानात बदल झाल्याने आता थेट इंडेलिबल इंकचे मार्करच निर्यात केले जात आहेत. मतदानाव्यतिरिक्त या शाईचा उपयोग पल्स पोलिओ मोहिमेतही केला जातो. पोलिओ लस दिलेल्या मुलांच्या बोटावरही हीच खूण केली जाते.

या शाईमध्ये 10 ते 18 टक्के सिल्व्हर नायट्रेट असतं. ही शाई त्वचेवर लावताच शरीरातील मीठाशी प्रतिक्रिया होऊन सिल्व्हर क्लोराइड तयार होतं. हे रसायन पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे शाईचा डाग सहज निघत नाही. काही सेकंदांतच शाई सुकते आणि पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग अधिक गडद होतो. साबण, तेल किंवा पावडर वापरली तरी किमान 72 तास तरी हा डाग पुसता येत नाही.

1960 च्या दशकापासून भारतात या शाईचा वापर सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत निवडणूक आयोग लाखो बाटल्यांची मागणी करतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 21 लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती, तर 2019 मध्ये ही संख्या वाढून 26 लाखांपर्यंत पोहोचली.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानानंतर ही शाई डाव्या हाताच्या तर्जनीवर नखापासून पहिल्या पेरापर्यंत ब्रशने लावली जाते. जर त्या बोटावर आधीपासून शाईची खूण असेल, तर ती मध्यमा किंवा त्यानंतर अनामिकेवर लावण्याची तरतूद आहे. दोन निवडणुकांमध्ये कमी अंतर असल्यास मतदार ओळखण्यासाठी हा नियम महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारे, छोट्याशा जांभळ्या खुणेमागे भारताचं तंत्रज्ञान, रसायनशास्त्र आणि लोकशाहीची मजबूत यंत्रणा कार्यरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ