spot_img

Thackeray Brothers : “भाजपाची एक्सपायरी डेट जवळ” ठाकरे बंधुंचा विऱोकांना इशारा

spot_img

महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत ठाकरे बंधू आक्रमक; मराठी महापौराचा निर्धार, दिल्लीतूनच निर्णय होत असल्याचा आरोप

राज्यातील महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत महापालिका निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीमुळे सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं जात आहे ते मुंबई महापालिकेने. राज्यातील 29 महापालिकांपैकी मुंबई महापालिकेची निवडणूकच सध्या केंद्रस्थानी आहे.

मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोर लावत असताना, ठाकरे बंधूंनी ठाम भूमिका घेतली आहे. “मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच असेल आणि तो आमच्याच पक्षाचा असेल,” असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत “मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही,” असे विधान केले होते.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या संयुक्त मुलाखतीत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे बंधूंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मुख्यमंत्र्यांची इच्छा चांगली असू शकते, पण प्रत्यक्षात निर्णय त्यांच्या हातात नाहीत. “दिल्लीहून जे सांगितलं जाईल तेच त्यांना करावं लागतं. त्यामुळे वरच्या लोकांच्या मनात काय आहे, हेच महत्त्वाचं आहे,” असा आरोप त्यांनी केला.

भाजपाच्या घोषणांवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही म्हणतो की मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल, तर भाजपा म्हणते हिंदू महापौर असेल. मग मराठी माणूस हिंदू नाही का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मुंबईला आर्थिक केंद्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मनमोहन सिंग यांच्या काळात होता, मात्र तो मोदी-शहा यांनी गुजरातला हलवल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या पूर्वीच्या एका विधानाची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी “भाजपाला मोदींची आणि पैशांची मस्ती आहे” असे म्हटले होते. यावर राज ठाकरे म्हणाले, “हो, त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. लहानपणी आपण पत्त्यांचा बंगला उभारायचो; भाजपाचाही बंगला तसाच आहे, पण तो उलटा आहे.” आज भाजपाला मिळणारं मतदान केवळ नरेंद्र मोदी यांच्या नावावर होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

या सगळ्या घडामोडींमध्ये ठाकरे बंधूंनी भाजपाची “एक्सपायरी डेट” जवळ आल्याचा उल्लेख करत आगामी निवडणुकांत मोठा राजकीय बदल होण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हा सामना नेमका कुणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ