साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं.
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील जातेगाव शिवारात एक अत्यंत धक्कादायक व मन हेलावून टाकणारी घटना घडली असून, मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून ही पितृहत्येची घटना घडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि. 05) सकाळी साडेसातच्या सुमारास विठ्ठल तुकाराम गायकवाड (58) यांचा मृतदेह मळ्यातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती भरत गायकवाड यांनी नातेवाईकांना दिली. यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, विठ्ठल गायकवाड यांच्या डोक्यावर, तोंडावर व ओठांवर गंभीर जखमा दिसून आल्या. बिछान्यावरही मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. याबाबत पोलिसांना अवगत केल्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू केली. यावेळी मृताचा मुलगा श्रीकृष्ण गायकवाड घटनास्थळी उपस्थित होता. त्याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलगा श्रीकृष्ण याने जमलेल्या लोकांसमक्ष गुन्ह्याची कबुली दिली.




